8 वी NMMS इतिहास युरोप आणि भारत नोट्स


महत्त्वाचे मुद्दे
 1. प्रबोधनयुग
 अ) प्रबोधनयुग 1) इसवी सनाचे 13 वे ते 16 वे शतक हा काळ युरोपच्या इतिहासातील प्रबोधनकाळ मानला जातो. 
2) 'प्रबोधन, भौगोलिक शोध व धर्मसुधारणेची चळवळ' या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला; म्हणून या काळास 'प्रबोधनयुग' असे म्हणतात. 
 ब) प्रबोधनयुगाची वैशिष्ट्ये : 1) युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांत बदल झाल्याने सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. 
2) मानवतावादाला चालना मिळाली. 
3) माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. 
4) माणूस हा धर्माऐवजी विचारांचा केंद्रबिंदू बनला. 
5) कला, साहित्य यांमधून मानवी भावभावना आणि संवेदना यांचे चित्रण होऊ लागले. 
6) लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषेत साहित्यनिर्मिती होऊ लागली. 
7) ग्रीक व रोमन या प्राचीन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. 
 महत्त्वाचे : सन 1450 मध्ये जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. त्यामुळे प्रबोधनकाळातील नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले. 
 2. धर्मसुधारणा चळवळ : 1) स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांना विरोध केला. 
2) ख्रिस्ती धर्मगुरू लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कर्मकांडांचे स्तोम माजवून लोकांना लुबाडत होते. 
3) जुन्या धार्मिक कल्पना, कर्मकांडांचे स्तोम याविरोधात युरोपात जी चळवळ झाली तिला 'धर्मसुधारणा चळवळ' असे म्हणतात. 
4) या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्त्वांना महत्त्व प्राप्त झाले. 
 3. भौगोलिक शोध : 
 अ) भौगोलिक शोधाची आवश्यकता : 
 1) सन 1453 मध्ये बायझन्टाईन साम्राज्याच्या राजधानीचे शहर कॉन्स्टॅन्टिनोपल (इस्तंबूल) हे ऑटोमन तुकांनी जिंकले. 2) या शहरातून व्यापाराकरिता उपयुक्त ठरणारा खुश्कीचा मार्ग जात होता. 
3) तुर्कीनी हा मार्ग रोखल्यामुळे युरोपियन देशांना आशियाई देशांमध्ये व्यापार करण्यासाठी नवे मार्ग शोधणे आवश्यक वाटू लागले. 
4) युरोपीय दर्यावर्दी 15 व्या शतकात भारताकडे जाणाऱ्या जलमार्गांचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले. 
 (ब) भौगोलिक शोध : 
1.बार्थोलोम्यू डायस
मूळ देश - पोर्तुगाल
सन - इ.स. 1487
शोध - भारताचा शोध घेण्यासाठी निघाला. प्रत्यक्षात तो आफ्रिकेचे दक्षिण टोक 'केप ऑफ गुड होप'पर्यंतच पोहोचला.

2) ख्रिस्तोफर कोलंबस
मूळ देश - इटली
सन - इ.स.1492
शोध - भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन पोहोचला.

3) वास्को-द-गामा
मूळ देश - पोर्तुगाल 
सन - इ.स.1498
शोध - केप ऑफ गुड होप'ला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला. (ii) सागरी मागनि भारतात आलेला हा पहिला युरोपीय.

4. युरोपातील वैचारिक क्रांती :

1) युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली.
2) पूर्वीच्या अंधश्र‌द्धा व अज्ञान यांतून त्याचप्रमाणे प्रस्थापित रूढी व परंपरा यांतून बाहेर पडू लागला.
3) प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सकपणे पाहू लागला. या बदलांनाच 'वैचारिक क्रांती' असे म्हणतात
4) या वैचारिक क्रांतीमुळे युरोपात वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळाली.

5. राजकीय क्षेत्रातील क्रांती :
18 व्या व 19 व्या शतकांत युरोपात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे या कालखंडास 'क्रांतियुग' असे म्हणतात.

क्रांतियुगातील घटना :

1) बिल ऑफ राईट्स
सन - इ.स. 1689
माहिती - 1) इंग्लंडच्या पार्लमेंटने हा कायदा मंजूर केला.
2) या कायदयाने राजाच्या अधिकारांवर मर्यादा आल्या.
3) इंग्लंडचे पार्लमेंट सार्वभौम झाले.
4) इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीच्या विकासाला चालना मिळाली.

2) अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध
सन - इ.स. 1776 ते 1781
माहिती - 1) अमेरिकेच्या शोधानंतर साम्राज्यवादी देशांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या.
2) इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहती स्थापन केल्या.
3) वसाहतींवर जाचक बंधने व कर लादल्यामुळे या वसाहतींत असंतोष निर्माण झाला.
4) जॉर्ज वॉशिंग्टन याच्या नेतृत्वाखाली वसाहतींतील सैन्याने एकत्र येऊन इंग्लंडने पुकारलेल्या युद्धाला प्रतिकार केला. ही घटना 'अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध' म्हणून ओळखली जाते.
5) या युद्धात वसाहतींचा विजय होऊन 'अमेरिकेची संयुक्त संस्थाने' हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले.

3. फ्रेंच राज्यक्रांती
सन - इ.स. 1789
माहिती - 1) अनियंत्रित राजेशाही व सरंजामशाही यांच्याविरुद्ध फ्रेंच जनतेने केलेला उठाव व प्रजासत्ताकाची स्थापना ही घटना म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती होय.
2) फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची देणगी दिली.

4. औद्योगिक क्रांती 
 सन : 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात
माहिती - 1) बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्रांच्या साहाय्याने उत्पादन होऊ लागले.
2) हातमागाऐवजी यंत्रमाग आले.
3) घरगुती उद्योगांऐवजी कारखाने उभे राहिले.
4) आगगाडी, आगबोटी यांमुळे वाहतूक वेगवान झाली.
5) औदयोगिक क्रांती प्रथम इंग्लंडमध्ये झाली.
6) औदयोगिक भरभराटीमुळे इंग्लंडचे वर्णन 'जगाचा कारखाना' असे केले जाऊ लागले.

6. भांडवलशाहीचा उदय :

1) नव्या सागरी मार्गाच्या शोधामुळे युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली.
2) एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नसल्याने अनेक व्यापारी एकत्र येऊन व्यापार करू लागले.
3) भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या सुरू झाल्या.
4) युरोपिअन देशांची आर्थिक भरभराट झाली.
5) युरोपिअन राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देत. त्यामुळे उद्योगधंदयांत वाढ होऊ लागली.
6) त्यातूनच युरोपीय देशांत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला.

7. वसाहतवाद :

1) एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या देशातील विशिष्ट भूभागात वस्ती करणे, म्हणजे 'वसाहत स्थापन करणे' होय.
2) एखादया आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर व्यापलेल्या भूप्रदेशावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे 'वसाहतवाद' होय.

8 . साम्राज्यवाद :

1) विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करून नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजे 'साम्राज्यवाद' होय.
2) वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला.
3) आशिया व आफ्रिका या खंडांतील अनेक राष्ट्रे युरोपीय देशांच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडली.

9. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद :

1) इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली.
2) मुघल बादशहा जहांगीर याच्याकडून कंपनीने व्यापाराकरिता परवानगी मिळवून सूरत येथे वखार स्थापना केली.

10. इंग्रज व फ्रेंच संघर्ष :

1) भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच प्रतिस्पर्धी होते.
2) या स्पर्धेतून इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन वेळा युद्धे झाली. ही युद्धे 'कर्नाटक युद्धे' म्हणून ओळखली जातात.
3) तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. त्यामुळे इंग्रजांना भारतात प्रबळ विरोधक राहिला नाही.

11. बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया :

1) भारतात त्यावेळी अत्यंत समृद्ध असा बंगाल हा प्रांत होता.
2) सन 1756 मध्ये सिराज उ‌द्दौला हा या समृद्ध बंगाल प्रांताचा नवाब झाला.
3) कंपनीचे अधिकारी मुघल बादशहाकडून मिळालेल्या व्यापारी सवलतींचा बंगाल प्रांतात गैरवापर करीत होते.
4) नवाबाची परवानगी न घेता इंग्रजांनी कोलकात्याच्या वखारीभोवती तटबंदी उभारली.
5) सिराज उ‌द्दौला याने आक्रमण करून ही वखार काबीज केली.
6) इंग्रजांचा सेनापती रॉबर्ट क्लाईव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास आपल्या बाजूने वळवले.
7) सन 1757 मध्ये प्लासी येथे नवाब व इंग्रज यांच्यातील युद्धात मीर जाफरच्या नेतृत्वातील सैन्य लढलेच नाही. म्हणून सिराज उद्दौलाचा पराभव झाला.
8) मीर जाफर बंगालचा नवाब झाल्यानंतर त्यानेही इंग्रजांना विरोध करताच इंग्रजांनी मीर जाफरचा जावई मीर कासिम याला नवाब बनवले.
9) मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला विरोध करताच इंग्रजांनी पुन्हा मीर जाफर यास नवाबपद दिले.
10) मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशहा शाहआलम यांनी इंग्रजांच्या कारवायांना लगाम (विरोध) घालण्याचा प्रयत्न केला.
11) सन 1764 मध्ये बिहार मधील बक्सार येथे इंग्रज व मीर कासिम, शुजा उद्दौला आणि शहाजहान यांच्यात युद्ध झाले. हे युद्ध 'बक्सारची लढाई' म्हणून प्रसिद्ध आहे.
12) या युद्धात इंग्रजांचा विजय झाला. त्यांच्यात अलाहाबादचा तह झाला.
13) या अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुध्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार कंपनीला मिळाला.
14) भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला.

12. इंग्रज - म्हैसूर संघर्ष :

1) हैदरअलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य जिंकले होते.
2) हैदरअलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान याने इंग्रजांशी अखेरपर्यंत लढा दिला.
3) 1799 च्या श्रीरंगपट्टणच्या लढाईत टिपू सुलतान मारला गेल्यामुळे म्हैसूरचा प्रदेश इंग्रजांना मिळाला.

13. सिंधवर कब्जा :

1) भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले.
2) रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करील, म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचे ठरवले.
3) अफगाणिस्तान जिंकायचे म्हणून इंग्रजांनी सिंधचे महत्त्व लक्षात घेऊन, सन 1843 मध्ये सिंध प्रांतावर कब्जा केला.

14. शीख सत्तेचा पाडाव :

1) 19 व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजितसिंहाच्या हाती होती.
2) रणजितसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीपसिंग याला गादीवर बसवून राणी जिंदन पंजाबचा कारभार पाहू लागली.
3) सरदारांवर राणीचा अंकुश नसल्याचे पाहून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले.
4) इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असे वाटून शिखांनी इंग्रजांवर आक्रमण केले. या पहिल्या युद्धात शिखांचा पराभव झाला.
5) इंग्रजांचे वर्चस्व सहन न होणारे काही शीख सरदार मुलतानचा अधिकारी मूलराज याच्या इंग्रजविरोधी बंडात सामील झाले.
6) 1849 साली झालेल्या दुसऱ्या शीख - इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला व इंग्रजांनी पंजाब प्रांत आपल्या राज्याला जोडला.

महत्त्वाचे :

लिओनार्दो-द-विंची :

1) प्रबोधनयुगातील एक जगप्रसिद्ध चित्रकार व प्रबोधन काळातील अष्टपैलू मानले जाणारे व्यक्तिमत्त्व.
2) 'मोनालिसा' व 'द लास्ट सपर' या त्याच्या चित्रकृती अजरामर ठरल्या.
3) चित्रकलेबरोबरच स्थापत्य, संगीत, गणित, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी या विविध विषयांवरही त्याचे प्रभुत्व होते.

No comments:

Post a Comment